गिरीमित्र संमेलन २०१३
नाशिक, १५ जुलै २०१४:
इथल्या गुहा, डोंगर, मंदिरे, तळी, टाकी, पायर्या बुरूज हे सर्व तुमच्या मालकीचे...जगाला हेवा वाटावा अशा महाराष्ट्राच्या इतिहासाचे तुम्ही वारसदार...आम्ही,'शासन' तर फक्त त्यावर देखरेख करणारी यंत्रणा...हा अनमोल ठेवा आता तुमच्या हातात...त्याचे काळजीपूर्वक रक्षण करा...संवर्धन करा...''या आमच्या वनात या...वनातल्या डोंगरांवर या...इथल्या मुळनिवासींचा पाहुणचार घ्या...अशा शब्दात महाराष्ट्राचे प्रधान वनसचिव श्री. प्रविण परदेशी यांनी घातलेली साद असो की, कुठल्याही सरकारी मदतीशिवाय गेली तीस वर्षे अविरतपणे एक जंगल फुलविण्याचा ध्यास घेणारा आसामचा गुराखी जादव पेयांगशी झालेला साक्षात्कार, १३व्या गिरीमित्र संमेलनाच्या मेजवानीने महाराष्ट्राच्या गिरीमित्रांना भरपेट तृप्त केले...
मुलुंडचे महाराष्ट्र सेवा संघ आणि गिरीमित्र संमेलन हे स्थापनेपासून, गेल्या तेरा वर्षांपासून एक समिकरण बनले आहे...दरवर्षी संमेलनाची दर्जात्मक उची वाढतच आहे...यंदाही काही महत्वपूर्ण बदलांसह या संमेलनाने यंदा जंगल हा विषय केंद्रस्थानी ठेवला होता...या शिवाय वर्षभरातील हिमालय व सह्याद्रीतल्या मोहिमांचे व इतिहास व पर्यावरणावरील सादरीकरणाने या संमेलनात पंचपक्वान्न मेजवानी मिळाली...
गिर्यारोहणात तुम्ही स्वत:ला सापडवू शकतात...
http://rajshrimarathi.com/video/47852/13th-girimitra-sammelan/
गिर्यारोहणावरील फिल्मस्, मोहिमांचे अनूभव, मुलाखती, प्रश्नमंजुषा अशा भरगच्च कार्यक्रमांची दिडदिवस नुसती रेलचेल होती...दुसरा दिवस मुख्य...महाराष्ट्राच्या पहिल्या महिला गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ''पुण्यात बापूकाका पटवर्धन यांच्या प्रेरणेने गडकिल्ल्यांवर जाण्यांची, डोंगरांवर आरोहणाची गोडी लागली'', असे सांगत पागे यांनी केवळ आपल्या आईमुळे गिर्यारोहणात येऊ शकले, असे नमुद केले. पागे ही महाराष्ट्राची पहिली महिला गिर्यारोहक...
त्याकाळी मुली याखेळात नव्हत्याच, तेव्हा त्यांनी मुलांच्या सोबतीने मोहिमा केल्या, गिर्यारोहणाचे हिमालयात प्रशिक्षण घेतले...आईने मुलांसोबत जाऊ दिले...लग्न झाल्यावरही आई आपल्या मुलांचा सांभाळ करायची, म्हणूनच मला गिर्यारोहण करता आले'', अशा शब्दात पागे यांनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली...शेवटी, 'तुम्ही गिर्यारोहक मनतात, तेव्हा त्यात तु्म्ही
स्वत:ला सापडवतात', अशा वाक्यांनी त्यांनी प्रचंड टाळ्या घेतल्या.
डोंगर...जंगल...तुमचेच!
''तुमच्या गावातला डोंगर तुमचा...तुमच्या आसपासचे जंगल तुमचे...तिथली मंदिरं, तिथल्या गुहा लेणी, पाण्याची टाकी सर्व काही तुमचे, त्यांचे संवर्धन करण्याकडे जबाबदारी म्हणून बघु नका, जितके स्वच्छ तुमचे घर ठेवतात, तितक्याच आत्मियतेने तुमच्या परिसरातील या निसर्गाच्या अनमोल ठेव्याचे नी आपल्या महान ऐतिहासिक वारशाचे जतन करा'', अशी साद महाराष्ट्र वनविभागाचे प्रधान सचिव श्री. प्रविण परदेशी यांनी घातली आणि महाराष्ट्राच्या गिरीप्रेमिंनी टाळ्यांचा जोरदार गजर करून प्रविण परदेशी यांना अभिवादन केले...
एकीकडे महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील डोंगर व परिसरातील गिर्यारोहण, गिरीभ्रमण व इतर साहस मोहिमांवर निर्बंध आणून या खेळाच्या प्रसार व प्रचारावर बंधने घालण्याची भाषा करत असताना १३व्या गिरीमित्र संलनात महाराष्ट्र शासनाच्या पर्वतारोहण नियमावलींवर संयमीत प्रतिक्रीया उमटल्या. राज्याच्या वनविभागाने डोंगरवेड्यांना, ''या आमच्या वनात या'', अशा स्पष्ट शब्दात केलेले आवाहन केल्याने वन खाते व महाराष्ट्रातील गिरीमित्र यांच्यातील नातेसंबंधाचा नवा अध्याय बघायला मिळाला...
पर्यावरण समतोल राखण्यात वनांचे महत्व वन अधिकार्यांना पटावे याकरिता वनखात्याच्या अधिकार्यांची चक्क कळसुबाईच्या शिखरावर बैठक आयोजित करण्याचा बहुमान मिळवणारे श्री. परदेशी यांनी किल्ल्यांवरचे पर्यावरण दुषित झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. जागतिक उष्मीकरण, वातावरणातील बदलांमुळे किल्ल्यावरची तळी, टाकी दुषीत झाली नसुल माणसांनीच ती घाण केल्याचे त्यांनी नमुद केले. गंगोत्रीच्या रस्त्यावर दुतर्फा तब्बल ४० किलोमिटर्स पर्यंत लोकांनी प्रातर्विधी करून तिथले वातावरण दुषित केल्याचे आढळले....लोक आपली घरे तर कमालीची स्वच्छ ठेवतात, पण सार्वजनिक ठिकाणे आपली नाहीत, या भावनेने तिथे निसंकोचपणा घाण करतात...हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रात संयुक्त वन व्यवस्थापन
समित्यांची स्थापना करण्यात आली आहे...येणार्या पर्यटकांकडून नाममात्र शुल्क वसुल करण्याचे अधिकार या समित्यांना देण्यात आले आहे...पर्यटकांनी त्यांच्याकडून भोजन विकत घ्यावे...भोजन व निवासाची त्यांनी रक्कम द्यावी...त्यामुळे या लोकांना रोजगार मिळेल...जळावणाकरिता लाकडांची तोड होणार नाही...जंगल आपल्या मालकीचे, म्हणून मग ही माणसे त्याची देखभाल ठेतील, या कल्पनेने या समित्यांना आकार देण्यात
आला आहे...सिंहगडावर वर्षभरात सव्वा कोटी रूपये गोळा झाले...गडाच्या पायथ्याच्या तीन गावात आता एल.पी.जी. सिलेंडर ७०% अनुदानावर दिले जाते...लोकांना रोजगार मिळाला आहे...नष्ट न होणार्या कचर्याचा पुनरर्वापर केला जातो...ही प्रक्रीया बरीच खर्चिक असली तरी किमान कचरा तरी गोळा होतो व त्यातूनही रोजगार उपलब्ध झाला आहे, अशा शब्दात त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची यशोगाथा कथन केली.
नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक श्री. अरविंद पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील धोडप, साल्हेर-मुल्हेर, गाळणा, रामसेज, हातगड, विश्रामगड हे किल्ले संवर्धनासाठी घेतल्याची माहिती दिली. या किल्ल्यांवर येणार्यांकरिता निवासासाठी झोपड्या, तसेच काही ठिकाणी मनोरे, रेलींग, लाईट इत्यादी
व्यस्थेसंबंधी माहिती दिली. या डोंगरांवर औषधी वनस्पतींच्या लागवडीची योजना त्यांनी सादर केली. गिरीमित्रांनी त्यांच्याशी -९४२२ ००५ २४७ या क्रमांकावर संपर्क साधावा...
ठाणे येथील मुख्य वन संरक्षक के.पी. सिंग यांनी विभागात १८५४ ठिकाणी संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना केल्याची माहिती दिली. मागिल तीन वर्षांपासून या वनव्यवस्थापन समित्यांमार्फत जंगल बचाव मोहिम सुरू असून या समित्यांकरिता ५१,०००/-, ३१,०००/- व ११,०००/- रूपये असे पुरस्कार ठेवण्यात आल्याचे व ट्रेकर्स मंडळींसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विनाशाचे चक्रे उलटे कसे फिरवले जाऊ शकते!
![]() |
| Add ज्ञानेश्वर गांगुर्डे, अभिजीत बेलन, एव्हरेस्टवीर आशिष माने, राहुल सोनवणे, भाऊसाहेब कानमहालेcaption |
एखाद्या शहरात, किंवा डोंगरांवर पावसाळ्याच्या तोंडावर एक लाख रोपे लावण्याकरिता पंचवीस-तीस लाख रूपयांची तरतुद केली तर आश्चर्य वाटू नये...एका रोपाची किंमत १० ते २० रूपये, एक खड्डा खोदण्यासाठी दहा-पंधरा रूपये, वृक्षांच ने आण करणे, संरक्षक जाळ्या आदींवर हा निधी सहज खर्च होतो...आणि हाती काय मिळते...?
महानगरपालिका, राज्य शासन किंवा तत्सम संस्था जोमात वृक्षारोपण मोहिमा आयोजित करतात. पर्यावरण विषयी जागृती असेल किंवा सामाजिक जबाबदारीचे भान, पण अशा मोहिमांवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो....अशा अनेक वृक्षारोपण मोहिमांचा शेवट कशात झाला आहे, हे आपण गेल्या काही वर्षात जाणते, अजाणते पणी बघितले असेल...संपुर्ण महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी, वृक्षारोपणाच्या मोहिमांवर काही कोटी रूपये दरवर्षी खर्च होत असतात, पण तरीही वृक्षांची संख्या वाढते का? हा मात्र संशोधन करण्याचा विषय राहतो...विद्यार्थी, सार्वजनिक मंडळे व सामाजिक संस्थाच्या मदतीने लाखो वृक्षांची पावसाळ्याच्या तोंडावर वेगवेगळ्या भागात रूजवण केली जाते, पण आजवरचा अनूभव असा आहे की, फार...म्हणजे फार मोजक्या ठिकाणीच झाडे जगली आहेत...
आपल्या हिन्दूस्तानात सुदूर आसामात एक मनुष्य असा आहे, ज्याने एकट्याने वृक्षारोपणाचे शिवधनुष्य पेलले...गेल्या ३० वर्षांपासून हा माणूस आसामात ब्रम्हपुत्रेच्या एका नापिक क्षेत्रात वृक्षारोपणाची ज्योत तेवत ठेवतोय...सरकारच्या किंवा संस्थांच्या एक दमडी मदतीशिवाय...त्यातून त्याने ५५० हेक्टर क्षेत्रात घनदाट अरण्य फुलविले आहे....सरकारी जमिनीवरच्या या अरण्याविषयी वनखात्यालाच फार उशिराने माहिती मिळाली, जेव्हा ते नजिकच्या गावात विध्वंस माजविणार्या हत्तीच्या एका कळपाच्या मागावर होते...तिथे त्यांने इतके घनदाट जंगल बघुन कमालीचे आश्चर्य वाटले...
त्यातून जगाच्या समोर आला तो कोकिळामुख, जोरहाटचा जादव मोलाई पेयांग. गाव अरूणा छापरी, जिल्हा मजुली, आसाम. या माणसाने जंगलातूनच बिया गोळा केल्या...त्या रूजवल्या...त्यांना आपल्या ओंजळीने पाणी दिले आणि आता या ५५० हेक्टर क्षेत्रात मोठे समृद्ध जंगल तयार झाले आहे...
या जंगलात चार रॉयल बेंगॉल जातीचे वाघ आहेत....हत्तींचा कळप आहे...हरिण, निलगाई, गवे, अत्यंत दुर्मिळ एकशिंगी गेंडे व विपूल प्रमाणावर जैवविविधता इथे बघायला मिळते...या जंगलाचे राखीव वनात रूपांतर करण्याचा सरकारचा विचार आहे...पेयांगने ही किमया एकट्याने साधली...बघा काडीचाही खर्च न करता त्याने कसा स्वर्ग फुलवलाय!
समुद्रासारख्या अथांग ब्रम्हपुत्रेचे पाणीही या जमिनीचे काहीच करू शकत नाही का? नदीच्या काठाचा तर वाळवंट झालाय, एक दोन नव्हे, शेकडो साप उन्हात तडफडून मेलेत...आपणही असेच मरून जाऊ का? सोळा वर्षाच्या त्या भाबड्या मुलाच्या प्रश्नावर गावातली बुजूर्ग मंडळी चांगलीच हसली होती...असे काही होणार नाही...फुकटची काळजी करू नकोस! अशी त्याची बोळवण करण्यात आली होती...पण हे लोक सांगताहेत ते वास्तव नाही, हे त्या कोवळ्या जिवाला उमजले होते...मग त्याने हट्टाने बांबुच्या वीस-पंचवीस बिया त्यांच्याकडून घेतल्या...त्या जंगलात रूजवल्या...
१९८० साली पेयांग त्याच्या अरूणा छापोरी पासून ५ किलोमिटर्स वर असलेल्या गोलाघाट येथे सामाजिक वनिकरण विभागाच्या वृक्षारोपण मोहिमेवर पेयांग एक मजुर म्हणून कामाला होता...पाच वर्ष त्याने तेथे काम केले....मोहिमेचे काम संपल्यावर बाकी सर्व मजूर आपले काम संपल्यावर निघुन गेले...पेयांग गेला नाही...त्याने झाडांचे देखभाल करायला सुरूवात केली...आजुबाजुला जाऊन आणखी बिया गोळा केल्या...सतत ३० वर्षे त्याचे हे काम सुरू होते...
एक एक करून त्याने बिया गोळा केल्या...ओजळी ओंजळीने ब्रम्हपुत्रेचे पाणी देऊन त्यांचे संगोपन केले...आणि त्याच्या डोळ्यादेखत झाडे तयार झाले....त्यांना सोबत करण्यासाठी तो मुंग्या व किटक घेऊन यायचा...त्यांच्या येण्याने जंगल अधिकच जोमाने फुलले...हळू हळू तिथे पक्षी व प्राण्यांचा विहार सुरू झाला...पेयांगने आपला संसार मग या जंगलाच्या काठावर थाटला...त्याची पत्नी बिनीता व तीन मुलेही तिथेच राहतात...त्यांनी गाई व
म्हशी पाळल्या...त्यांचे दुध विकूनच ते आपला उदर्निवाह करतात...आजवर वाघांनी त्याच्या १०० गाई फस्त केल्यात...पण तरीही त्याचा वाघांवर राग नाही...माणूस व माणसाकडची बंदूक हेच वाईट असल्याचे त्याचे ठाम मत आहे...
हत्तीची भाषा
महाराष्ट्रातील साहसवीरांचे सादरीकरण या संमेलनाचे महत्वाचे अंग ठरले, तर ८००० मिटर्सवरील पर्वतारोहणात भारतीय गिर्यारोहकांच्या अनूभवांनी
सार्यांना रोमांचित केले...१३ वर्षात गिरीमित्र संमेलनाने सातत्याने चढता आलेख राखला आहे...यंदा काही मोहिमांना त्यांनी अर्थसहाय्य करून आपल्या
शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला...गिरीयात्रेतल्या छायाचित्रणालाही संमेलनात रोख रकमा देऊन सलाम करण्यात आला....शेवटी त्यांच्या डोळ्यातूनच जगाला या खेळाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते!
गिरीप्रेमीचे मकालूवीर तसेच नागपूर माऊन्टेनियर्स व ट्रेकक्षितीज या दोन संस्थांचा विषेश सन्मान करण्यात आला...
अाठवण 'निळावंती'ची
नोकरीनिमीत्त केरळला गेलेल्या आनंद शिंदे यांनी रम्बलिंग अर्थात हत्तींची भाषा अवगत करण्याचा प्रयत्न केले...त्यातून त्यांनी विविधठिकाणच्या हत्तीशीसंधलेला संवाद व त्यावरची फिल्म कौतुकाचा विषय ठरली....
काळाच्या गर्तेत हरवलेल्या 'निळावंती'ची या निमीत्ताने आठवण झाली...या प्राचिन ग्रंथान पक्षी व प्राण्यांच्या भाषेविषयी लिहीले आहे...जो कोण या ग्रंथाचे अध्ययन करील, तो पशू, पक्षांशी संवाद साधू शकत असे...'निळावंती' तर हरवलेला ठेवा आहे, परंतू आनंद शिंदेंनी ज्यापद्धतीने हत्तींशी संवाद साधला, ते बघुन अंगावर शहारे येत होते...
A Swivel Gun of Rasalgad, प्रविण कदम, साल्हेरचा रणसंग्राम, ओम्कार ओक यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली...
गडांबद्दलच्या ब्लॉग लेखन स्पर्धेत साईप्रसाद बेलसरे, अमित कुलकर्णी व पंकज झरेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला...
धवलागिरीवरचा थरार...
बसंत सिंघा रॉय यांच्या एव्हरेस्ट, अन्नपूर्णा, धवलागिरी मोहिमेच्या अनूभवांनी सर्वांना खिळवून ठेवले...कोलकात्याचे गिर्योरोहक एकापाठोपाठ एक आठ हजार मिटर उंचीची शिखरे करत होती...रॉयची वाणी ओजस्वी, त्यांचे बंगाली लहेजातील हिंदीचे उच्चार समजताना अडचण येत होती...परंतू त्यांनी व त्यांच्या चमुने एव्हेरेस्ट व त्यापाठोपाठ चो यू, धवलागिरी, अन्नपूर्णा, मकालू अशा मोहिमांचा धडाकाच लावला...त्यांच्या धवलागिरी व अन्नपूर्णाचा अनूभव अंगावर शहारे आणणारा होता...
चक्रम हायकर्सच्या द फ्लूटेड पिक व स्वप्नील पवारच्या तेज स्पर्श या लघुपटांनी वाह वाह मिळवली.
लघुपट स्पर्धेत निसर्गमित्रच्या चंदेरी स्वप्नाला प्रथम पारितोषिक मिळाले, तर सायकलने डोंगरकडा उतरण्याविषयीची डाऊन हिलला तृतीय, तर ठोसेघर
धबधबा आरोहणास द्वितीय पारितोषिक देण्यात आले.
साद अन्नपूर्णाची या पुस्तकाचे या प्रसंगी प्रकाशन करण्यात आले.
----------------



